कै. पु .लं देशपांडेची जन्मदिन ८ नोव्हेंबर .
माझा पण वाढदिवस त्याच दिवशी असतो.
अर्थात पु.लं च्या शैलीत
मी एक सामान्य असामी आहे. आणि भाई ही असामान्य अतुलनीय असामी आहे.
ईमेल वरुन आलेला हा लेख मला फार आवडला, व तो अनेकांपर्यंत पोचावा असे वाटले.
श्री. कुमार जावडेाकरांची पुर्व परवानगी घेतलेली नाही हे नम्रपणे नमुद करे इच्छितो.
पु. लं. च्या अखेरच्या प्रवासाबद्दलचा एक सुरेख लेख दै. लोकसत्तेत श्री. कुमार जावडेकरांनी लिहिला होता. पु. लं. च्या शैलीची पदोपदी आठवण करून देणारा हा लेख --
पु. लं. - अखेरचा अध्याय
'हॉस्पिटल' हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोषित करणं सोपं जातं... साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस. टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो... हॉस्पिटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे 'दुष्यंत' नावाचा कुत्रा जेव्हा होता, तेव्हा त्यानं केलेल्या स्वागतात सापडलेल्या पाहुण्यांना भेटायला (संबंध बिघडू नयेत म्हणून) मी हॉस्पिटलमधे गेलो होतो!
यावेळी मात्र मामला वेगळा होता. माझी प्रकृती थोडी नरम वाटल्यामुळे (किंवा कुठलीही गोष्ट मी नरमपणे घेत नसल्यामुळे) मंडळींनी मला हॉस्पिटलमधे नेण्याचा 'घाट' घातला. (अलीकडे 'वळण' जरी 'सरळ'पणाकडे 'झुकत' असलं, तरी 'घाटा'चा 'कल' मात्र अजूनही अवघडपणाकडेच आहे हे यावेळी माझ्या लक्षात आलं.) हॉस्पिटलमधे जायचा पूर्वानुभव फारसा नसल्यामुळे मी काय काय गोष्टी बरोबर नेता येतील, याचा विचार करू लागलो... पण मी नेसत्या वस्त्रांनिशीच जायचं आहे आणि कपड्यांची पिशवी मागाहून येईल असा खुलासा मला करण्यात आला. बाहेर पडताना मात्र मला उगाचच एच. मंगेशरावांनी बटाट्याच्या चाळीचं शिष्टमंडळ पाठवताना लावलेली 'ओ दूर जानेवाले' ची रेकॉर्ड आठवली.
हॉस्पिटलच्या खोलीत दाखल झाल्यावर मात्र, मी स्वतःवर आजारपण बिंबवण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागलो. (उगाच डॉक्टरांचा हिरमोड होऊ नये म्हणून!) डॉक्टर तपासत असताना मी चेहरा शक्य तितका गंभीर ठेवला होता. अर्थात मला तपासणाऱ्या डॉक्टरचा हिरमोड झाला नसावा, हे तो त्याच्या सहकाऱ्यांशी ज्या अगम्य भाषेतून बोलला, त्यावरून मी ताडलं. (बारा भाषांमधे मौन पाळता येणाऱ्या आचार्य बाबा बर्व्यांच्या सान्निध्यात काही काळ गेल्यामुळे काही अगम्य भाषांमधल्या संभाषणाचा रोख कुठे असावा, हे मी ओळखू शकत होतो. हे डॉक्टर्स जी भाषा बोलतात तिला 'मेडिकल लँग्वेज' म्हणतात आणि ती इंग्रजीच्या बरीच 'जवळून' जाते हे मी तुम्हांला खात्रीपूर्वक सांगतो!) ... त्यानंतर काही वरिष्ठ डॉक्टरांनीही येऊन मला तपासलं. आता माझी खात्री झाली की आजार खरोखर गंभीर असावा आणि मी चेहऱ्यावर गांभीर्य नाही आणलं तरी चालेल.
अशा रीतीनं माझं हॉस्पिटलमधलं बस्तान बसू लागलं, बसत होतं - एवढ्यात नकळतपणे - मला हॉस्पिटलमधे दाखल केल्याची 'बातमी फुटली'! (फुटते ती बातमी आणि फुटतो तो परीक्षेचा पेपर अशी एक आधुनिक व्याख्या मी मनाशी जुळवू लागलो.) पण काय सांगू? बातमी फुटल्याबरोबर मला भेटायला अनेक मंडळी येऊ लागली. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे जेवढं खरं आहे तेवढंच 'व्यक्ती तितके सल्ले' हे माझ्या लक्षात आलं. किंबहुना 'एका व्यक्तीमागे दहा सल्ले, तर अमुक व्यक्तींमागे किती' अशी गणितंही मी मनात सोडवू लागलो. (मला दामले मास्तर आठवले.) लोकांचे सल्ले मात्र चालूच होते... 'स्वस्थ पाडून राहा', 'विश्रांती घ्या' इथपासून 'पर्वती चढून-उतरून या' इथपर्यंत सूचना मिळाल्या. (एकानं 'सिंहगड'सुद्धा सुचवला!) 'प्राणायाम', 'योगासनं' पासून 'रेकी'पर्यंत अतिरेकी सल्लेही मिळाले! काही उत्साही परोपकारी मंडळींनी जेव्हा 'मसाज', 'मालिश' असे शब्द उच्चारले, तेव्हा मात्र डॉक्टरांनी मला तऱ्हेतऱ्हेच्या नळ्यांनी आणि सुयांनी जखडून टाकलं आणि लोक चार हात दूर राहूनच मला पाहू लागले.
हळूहळू माझ्या भोवतीचा हा सुया-नळ्यांचा वेढा वाढू लागला. (अगदी दिलेरखान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी घातलेल्या पुरंदरच्या वेढ्यासारखा!... मला हा विचार मनात येताच हरितात्या आठवले.) यानंतर माझी रवानगी आय. सी. यु.मधे (बालेकिल्ल्यावर?) करण्यात आली... अशा विचारांतच मला झोप लागली...मी डोळे उघडले तेव्हा आय. सी. यु.च्या काचेतून मला बघणारी माणसं मला दिसली. मी हसायचा प्रयत्न केला; पण जमत नव्हतं. अरे! पण हे काय? या सगळ्या माणसांचे चेहरे असे का? यांच्या डोळ्यांत पाणी का? मी हे असे शून्यात नजर लावलेले, भकास, उदास चेहरे कधीच पाहिले नव्हते आत्तापर्यंत! (अगदी 'बटाट्याच्या चाळी'च्या कार्यक्रमाच्या वेळेची लोकांची कुरकुरही बटाट्याच्या चाळीबद्द्ल नसून बटाट्याच्या वेफर्सची आहे हे जाणून घेतलं होतं मी!) आणि हे असे सगळे चेहरे माझ्यामुळे? ज्यांनी हसावं म्हणून मी कायम प्रयत्न करत आलो, त्यांचे चेहरे माझ्यामुळेच असे व्हावेत?
नव्हतं सहन होत मला हे. (आणि त्यांनाही.) मी डोळ्यांनी सुचवून पाहिलं मला काय म्हणायचं होतं ते. त्यांना कळलंच नाही ते! की कळूनही उपयोग नव्हता?... ते सगळे लोक समोर तसेच होते. अखेर मीच पुन्हा डोळे मिटले... अगदी कायमचेच...
आता ते सगळे लोक परत जातील आणि बहुधा माझी पुस्तकं त्यांना पुन्हा हसवतील... अगदी कायमचीच....